PM Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मोठा आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. वर्षभरात एकूण 6 हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जात असल्याने अनेक शेतकरी या योजनेकडे आशेने पाहतात.
मात्र, गावागावात एक प्रश्न कायम चर्चेत असतो. एका घरातील वडील आणि मुलगा दोघेही शेतकरी असतील, तर दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का? अनेक जण याबाबत संभ्रमात असतात. सरकारच्या नियमांमध्ये याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
एका कुटुंबाला किती जणांना मिळतो लाभ?
केंद्र सरकारच्या नियमांनुसार पीएम किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका पात्र सदस्याला दिला जातो. सरकारच्या व्याख्येनुसार पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं हे एकच कुटुंब मानले जाते. त्यामुळे एका घरातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्रपणे हप्ता मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज तपासणीदरम्यान बाद होतात. चुकीची माहिती दिल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो किंवा आधी मिळालेली रक्कम परत मागवली जाऊ शकते.
मग बाप-लेक दोघांनाही कधी मिळू शकतो लाभ?
सरकारने काही विशेष परिस्थितींमध्ये वडील आणि प्रौढ मुलगा दोघांनाही या योजनेचा लाभ घेण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे दोघांच्याही नावावर स्वतंत्र शेती जमीन असणे आवश्यक आहे. जर महसूल नोंदीमध्ये वडिलांच्या नावावर वेगळी जमीन आणि प्रौढ मुलाच्या नावावर वेगळी जमीन नोंद असेल, तर दोघेही स्वतंत्र शेतकरी म्हणून पात्र ठरू शकतात. अशा परिस्थितीत दोघांनाही 2 हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो.
मात्र, जमीन फक्त वडिलांच्या नावावर असेल आणि मुलाच्या नावावर कोणतीही जमीन नसेल, तर मुलाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी 7/12 उतारा आणि महसूल नोंदी तपासून घेणे महत्त्वाचे ठरते.
अर्ज करताना या चुका टाळा
पीएम किसान योजनेत अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवायसी, आधार लिंक किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे अडकतात. त्यामुळे अर्ज करताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते आणि जमीन नोंदी योग्य असणे आवश्यक आहे. तसेच ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक शेतकरी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने त्यांचे हप्ते थांबलेले दिसून येतात.
पुढचा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सरकारकडून साधारणपणे दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष 23 व्या हप्त्याकडे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. PM Kisan Samman Nidhi
शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर जमीन नोंदी, आधार लिंक आणि ई-केवायसी वेळेत पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत नियम समजून घेतल्यानंतरच अर्ज करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
1 thought on “पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? बाप–लेक दोघांनाही मिळणार का लाभ?”